ताज्या बातम्या

कल्याणराव काळे यांच्या भूमिकेकडे राजकीय वर्तुळाचे लक्षप्रतिनिधी 
आढेगाव : माढा विधानसभा मतदारसंघाला जोडलेल्या पंढरपूर तालुक्यातील ४२ गावांतून कल्याणराव काळे यांना माढा विधानसभा निवडणूक लढविण्याची आग्रही मागणी होत असली तरी सलग चारवेळा वाढत्या मताधिक्याने निवडूणक जिंकणा-या आमदार बबनदादा शिंदे यांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविण्याचे धाडस कल्याणराव काळे करणार का? याचीच जिल्हाभर चर्चा सुरु आहे. माढा विधानसभा मतदारसंघ जेव्हा एकसंध होता तेव्हा देखील आमदार बबनदादा शिंदे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येत होते. आणि माढा विधानसभा मतदारसंघाची माढा पंढरपूर व माळशिरस या तीन तालुक्यांमध्ये विभागणी झाली तरी देखील आमदार बबनदादांचे मताधिक्य कमी न होता ते वाढतच राहिले आहे. 
पंढरपूर तालुक्यामध्ये कल्याणराव काळे यांचे सहकार शिरोमणी व सीताराम महाराज हे दोन साखर कारखाने असून या साखर कारखान्यांच्या माध्यमातून त्यांची शेतक-यांशी नाळ जोडली गेली आहे. सामुदायिक विवाह सोहळा, दुष्काळात पाण्याच्या टाक्या वाटप, चारा छावणी, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या सामाजिक उपक्रमाव्दारे त्यानी जनतेची सेवा केली आहे. सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, औद्योगिक क्षेत्रात कल्याणराव काळे यांचे मोठे योगदान आहे. 
कल्याणराव काळे हे तरुण असल्याने पंढरपूर तालुक्यात त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. त्याचबरोबर विठ्ठल परिवाराच्या माध्यमातून तालुकाभर कार्यकत्र्यांचे जाळे आहे. शिवार पंढरपूर तालुक्यात आजपर्यंत काँगे्रस पक्ष जिवंत ठेवण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. 
परंतु वेळोवेळी काँगे्रस पक्षाने डावलल्याने त्यांचे कार्यकर्ते संतप्त झाले असून ते विधानसभा निवडणूक लढविण्याचा आग्रह करीत आहेत. बबनदादा व कल्याणराव काळे यांचे संबंध चांगले असल्याने ते आमदार बबनदादांच्या विरोधात निवडणूक लढविणार का याचीच जिल्हाभर चर्चा सुरु आहे

पालकांनी मुलांवरही लक्ष द्यावे : मंडलिक

प्रतिनिधी 
अकलूज : वाढती गुन्हेगारी व महिला, मुलींवरील अत्याचार याला केवळ तरूणच जबाबदार आहेत असे नाही तर त्याचे पालकही तितकेच जबाबदार आहेत. पालकांनी मुलींप्रमाणे मुलांवरही दबदबा ठेवला पाहिजे. त्यांच्या वाईट कृत्याला त्यांनी पाठिंबा देऊ नये, असे मत सोलापूर पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी व्यक्त केले. 
वेळापूर पोलिस ठाण्याच्यावतीने पोलिस जनता सुसंवाद तसेच सन २०१३ मध्ये सर्वोत्कृष्ट गणेशोत्सव मंडळाचा पुरस्कार मिळविलेल्या गणेशोत्सव मंडळांचा सन्मान पोलिस अधीक्षक मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी वेळापूर डॉक्टर असोसिएशनने पोलिस ठाण्याच्या आवारात बसविलेल्या वॉटर कुलरचे उद्घाटन मंडलिक यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आयोजित समारंभात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी अकलूज उपविभागाचे पोलिस उपअधीक्षक तिरूपती काकडे होते. 
मंडलिक म्हणाले, पोलिस हे जनतेचे सेवक आहेत. पोलिस व जनतेमध्ये सुसंवाद रहावा ही नेहमीच आमची भावना आहे. प्रगत तंत्रज्ञानामुळे जसे फायदे झाले आहेत तसे तोटेही खूप आहेत. आपण चांगल्या सवयी आत्मसात करीत नाही. परंतु वॉटस्अ‍ॅप, फेसबुकच्या माध्यमातून आलेली आक्षेपार्ह दृश्ये पाहून लगेच आपण रास्ता रोको, गाव बंद असे आंदोलन करून शासकीय व सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान करतो ही चुकीची बाब आहे. वाईट कृत्याला प्रतिसाद देऊ नका. सामाजिक दृष्टीकोनातून नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. लोकशाही मार्गाने जाऊन चांगल्या सवयी आत्मसात करा, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. सोलापूर जिल्ह्यात अवैध धंदे, महिला, मुलींवरील अत्याचार अशा घटना होऊ नयेत म्हणून आम्ही योग्य ती काळजी घेत आहोत. नागरिकांनी याकामी दक्ष राहून सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. 
तिरूपती काकडे म्हणाले, गणेशोत्सव मंडळाच्या माध्यमातून समाजोपयोगी उपक्रम कार्यकत्र्यांनी राबवावेत. घराप्रमाणेच आपला गाव, तालुका, जिल्हा, राज्य व देश सुंदर व निरोगी रहावे यासाठी प्रयत्न करा. मृत्यूनंतर समाजाला आपला विसर पडणार नाही, असे एखादे चांगले काम करा, असे आवाहन त्यांनी केले. 
प्रारंभी सपोनि नामदेव शिंदे यांनी वेळापूर पोलिस ठाण्याच्या माध्यमातून राबविण्यात येणा-या कायदा व सुव्यवस्थेची माहिती दिली. यावेळी स्वामीराज भिसे, डॉ.रविंद्र देशपांडे, प्रा.हरिश्चंद्र मगर, संजय मगर यांनी विचार मांडले. यानिमित्ताने सन २०१३ मध्ये गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविलेल्या श्रीक्षेत्र महात्मा फुले गणेशोत्सव मंडळ, वेळापूर, द्वितीय क्रमांक सिद्धीविनायक गणेशोत्सव मंडळ, वेळापूर, तृतीय क्रमांक विभागून स्वाभिमानी गणेशोत्सव मंडळ, शेरी व लोकमान्य गणेशोत्सव मंडळ, निमगाव मगराचे व एक गाव एक गणपती स्पर्धेत साळमुखवाडी, बोंडले, तोंडले, धानोरे, खळवे, फळवणी, दसूर या गावांना दत्तात्रय मंडलिक यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मानीत करण्यात आले. 
या समारंभास अमृतराज माने-देशमुख, बाळासाहेब धार्इंजे, विश्वास वाघे, पांडुरंग मंडले, चंद्रकला भिसे, वंदना कचरे, डॉ. व्ही. जी. सुरवसे, प्राचार्य संजय गळीतकर, जीवन पाटील, खुदबुद्दीन कोरबू, अनंत होडगे यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी, सरपंच, उपसरपंच, सदस्य, पोलिस पाटील, व्यापारी, डॉक्टर, वकील, गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूर्यकांत भिसे यांनी सूत्रसंचालन केले. अ‍ॅड. दत्तात्रय आडत यांनी आभार मानले.

मोदींच्या कार्यक्रमावर मुख्यमंत्री चव्हाणांचा बहिष्कारनागपूर – सोलापूरातील मोदींच्या कार्यक्रमात घडलेल्या प्रकारानंतर आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूरात होत असलेल्या मेट्रो भूमिपूजन समारंभाला मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अनुपस्थित राहण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय कालच पत्रकारांना सांगण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार शनिवारी पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापूरात चार पदरी राष्ट्रीय महामार्गाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उपस्थित होते. मात्र त्यांचे भाषण सुरू असतानाच तेथे जमलेल्या मोदी समर्थकांनी मोदींच्या नावाचा गजर करून मुख्यमंत्र्यांचे भाषण बंद पाडले. ही घटना अतिशय दुर्देवी असल्याचे चव्हाण यांनी नमूद केले आणि मोदीं च्या हस्ते होणार्‍या कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत या संदर्भात म्हणाले की मोदींची हुकुमशाही मेंटॅलिटी खरी होताना आता दिसू लागले असून ज्या राज्यांत काँग्रेस सरकार आहे तेथील मुख्यमंत्र्यांचा अपमान करण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. हरियानातही असाच मुख्यमंत्र्यांचा पाणउतारा केला गेला. भविष्यात असले प्रकार अथवा घटना सहन केल्या जाणार नाहीत.
महाराष्ट्र भाजप नेते व विरोधी पक्ष नेते विनोद तावडे यांनी मात्र यात भाजपचा कोणताही कावा अथवा वाईट हेतू नव्हता आणि मुख्यमंत्र्यांनी राज्यातील पंतप्रधानांच्या कार्यक्रमाला उपस्थित राहणे हा प्रोटोकॉल असल्याने मुख्यमंत्र्यांनी उपस्थित राहावे असे मत व्यक्त केले आहे.

सोलापुरात सुशीलकुमार यांची इभ्रत पणाला
येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यातल्या काही मतदारसंघात कॉंग्रेस पक्षाची आणि पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांची अब्रू पणाला लागणार आहे. अशा मतदारसंघात माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्येचा प्रणिती शिंदे यांचा सोलापूर शहर मध्य हा मतदारसंघ सवार्र्ंचे लक्ष वेधून घेणार आहे कारण विद्यमान आमदार असलेल्या प्रणिती शिंदे तिथे पराभवाच्या छायेत आहेत. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांचा दणदणीत पराभव झाला. ते देशाचे गृहमंत्री आहेत आणि त्यांचा सोलापूरवर प्रभाव आहे त्यामुळे कितीही जोरदार मोदी लाट आली तरीही शिंदे काही पडायचे नाहीत असे मानले जात होते कारण त्यांच्याविरोधातला भाजपाचा उमेदवार त्यांच्या मानाने फारच किरकोळ होता. सुशीलकुमार शिंदे निसटत्या मताधिक्याने का होईना पण निवडून येतील असे वाटत असतानाच ते तब्बल दीड लाख मतांनी पडले.
लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानात शहर मध्य मतदारसंघात भाजपाचे उमेदवार शरद बनसोडे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्यापेक्षा ३१ हजार जादा मते मिळवली ही बाब शिंदे यांच्या पराभवापेक्षा अधिक धक्कादायक ठरली. कारण या मतदारसंघात २००९ साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्या कन्या प्रणिती शिंदे या तब्बल ४० हजारांनी निवडून आल्या होत्या. अशा मतदारसंघात खुद्द शिंदे यांना ३१ हजार मते कमी मिळाली याचा अर्थ या मतदारसंघातल्या ७१ हजार मतदारांनी कॉंग्रेसकडे पाठ फिरवली आहे. २००९ सालचा प्रणिती शिंदे यांचा विजय चांगलाच होता, कारण त्यांनी तीन वेळा आमदार असलेले प्रभावशाली कामगार नेते नरसय्या आडम यांना पराभूत केले होते. अर्थात हा विजय कसा झाला हे अनेकांना माहीत आहे. तो अपघाताने झालेला विजय होता. दरम्यान पुलाखालून भीमेेचे पाणी वाहून गेले आहे आणि प्रणिती शिंदे यांचा प्रभाव ओसरला. यावेळी त्यांना लढत सोपी नाही. कारण त्यांना आता कॉंग्रेसमधूनच आव्हान निर्माण झाले आहे.
सोलापूरच्या राजकारणातला सुशीलकुमार शिंदे यांचा प्रभाव घटण्यास त्यांचे परममित्र विष्णुपंत कोठे हेच जबाबदार आहेत. त्यांनीच २००४ साली सुशीलकुमार शिंदे यांच्या पत्नी उज्ज्वलाताई यांचा पराभव घडवून आणण्यात सिहाचा वाटा उचलला होता. श्री. कोठे हे गेल्या २५ वर्षांपासून शिंदे यांच्या संपर्क कार्यालयाचे प्रमुख म्हणून काम पहात आहेत. त्यांनी हे कार्यालय चालवता चालवता महानगर पालिकेच्या राजकारणावर आपले वर्चस्व निर्माण केले आहे. त्यांनी आपल्या मुलाला महापौर केले. हाच मुलगा महेश कोठे हा मनपात कॉंग्रेसचा नेता होता. आपल्या या कामाबद्दल आपल्याला आमदार किंवा खासदार होण्याचेे बक्षिस मिळाले पाहिजे अशी कोठे पिता पुत्राची मागणी आहे. पण ती शिंदे यांना मान्य नाही. २००४ साली शिंदे यांनी लोकसभेला आपल्या पत्नीला उभे केले तेव्हा विष्णुपंत कोठे नाराज झाले. त्याचे फळही उज्ज्वलाताईंना भोगावे लागले. कोठे आणि शिंदे यांच्यात अंतर वाढत चालले.
आपल्याला खासदारपद नाही मिळाले. निदान आता आपला पुत्र महेश याला आमदारपद मिळावे अशी मागणी विष्णुपंतांनी केली. पण सुशीलकुमार शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीत आपल्या कन्येला पुढे केले. महेश कोठे याला शेजारच्या मतदारसंघात म्हणजे भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या शहर उत्तर मतदारसंघात उभे केले. म्हणजे तो निवडून येऊ नये. तिथून तो चुकून माकूनही निवडून येता कामा नये यासाठी शिेदे यांनी त्याला एका बाजूला तिकिट दिले आणि त्याच्या विरोधात एका राष्ट्रवादीच्या उमेदवारालाही उभे करून कॉंग्रेसच्या मतात स्वत:च फूट पाडली. त्यामुळे भाजपाच्या उमेदवाराला सहज विजय मिळाला. त्यामुळे कोठे आणि शिंदे यांच्यातले मतभेद वाढत चालले आहेत. महेश कोठे यांना आमदार होण्याची महत्त्वाकांक्षा गप्प बसू देत नाही. त्यांनी आता पक्षांतर केले असून शिवसेनेत प्रवेश केला आहे. भाजपा आणि शिवसेना यांच्या जागा वाटपात शिवसेनेच्या वाट्याला येणारी शहर मध्य ही जागा आता महेश कोठे लढवणार आहेत. त्यांनी मागच्या निवडणुकीत शहर उत्तर ही शेजारची जागा लढवून पराभव पत्करला होता. आता त्यांना शिवसेनेत जाण्याने शहर मध्य मतदारसंघात उभे राहून प्रणिती शिेदे यांना आव्हान द्यावे लागणार आहे. म्हणजे आता शहर मध्य मतदारसंघात प्रणिती शिंदे (कॉंग्रेस), महेश कोठे (शिवसेना) आणि नरसय्या आडम (माकपा) यांच्यात कॉंटे की टक्कर होणार आहे. ही लढत फार लक्षणीय ठरणार आहे.

35 गावांच्या पाणी प्रश्न सोडविण्यात आमदार भारतनाना भालके यशस्वी !


मंगळवेढा तालुक्यातील 35 गावांच्या पाणी प्रश्न सोडविण्यात आमदार भारतनाना भालकेसाहेब यशस्वी !
राज्यपालांची स्वाक्षरी झाली.मंगळवेढेकरांना क्रांतीदिनाची दिली भेट.
महाराष्ट्र सरकारचे हार्दिक अभिनंदन !

मंगळवेढामध्ये आज विशेष काय

मंगळवेढामध्ये आज विशेष काय//. //मंगळवेढा लाईव्ह वर जाहीरात देण्यासाठी मो. 9860371402 // --

छोटया जाहिराती मोठया करामती ..

...छोटया जाहिरातीकरीता आजच संपर्क साधा

मंगळवेढा लाईव्ह, तानाजी चौगुले मो ' 9860371402

आमच्याकडे शेततळे, विहीर, चारी व इतर पोकलेनची सर्वप्रकारची कामे करुन मिळतील.प्रोप्रा-श्री.बापूराव पांढरे मो.८३९०७९१८९१ ९७६४३५४०६२ // आकर्षक व कलात्मक फोटोसाठी विश्‍वासर्ह असे शहरातील एकमेव डिजीटल फोटो स्टुडीओ. मर्दा शॉपींग सेंटर, मंगळवेढाप्रोप्रा-श्री.संतोष पवारमो.९८२२३७५४४५ // मंगळवेढा तालुक्यातील सर्व फेसबुक मित्रांना नम्र विनंती आपल्या गावातील व आपल्या भागातील सर्व बातम्या सचित्र पाठवा त्या चांगल्या पध्दतीने मंगळवेढा लाईव्हवर व वर्तमानपत्रात प्रसिध्द केल्या जातील. बातम्या पाठविण्यासाठीtanajichougule@gmail.com या इमेलवर मेल कराव्यात. संपर्क -तानाजी चौगुले-९८६०३७१४०२

 
: NOTICE : © Copyright 2013—2014 -All rights reserved. मंगळवेढा लाईव्हवर प्रसिध्द झालेल्या बातम्या व इतर मजकूरातून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक/संचालक सहमत असतीलच असे नाही. ||// वेबसाईट संकल्पना —नवल मिडीया प्रा.लि. नळदुर्ग ता.तुळजापूर जि.उस्मानाबाद सपंर्क क्रमांक — 9421932546, 9657684370 // वेबसाईट रचना व तांत्रीक सहकार्य उमेश टोणपे औरंगाबाद